* आवश्यक त्या सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देऊ
* योग्य त्या उपचारासाठी चोख नियोजन करा
* कोरोना रुग्णांच्या माहितीचे संकलन अद्ययावत ठेवा
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात ससून रुग्णालयाच्या विविध विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आरोग्य विभागाचे माजी महासंचालक तथा कोविड-19 चे राज्य समन्वयक डॉ.सुभाष साळुंखे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजय तावरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. निरंजन तेलंग, भुमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक तथा समन्वय अधिकारी राजेंद्र गोळे, डॉ.समीर जोशी आदी उपस्थित होते.
पुण्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशासनाशी समन्वय ठेवावा. तसेच चोख नियोजन करुन बाधित रुग्णांवर वेळेत उपचार करावेत, असे सांगून डॉ.म्हैसेकर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांवर वेळेत आणि योग्य प्रकारे उपचार होण्यासाठी सुक्ष्म नियोजन करुन त्यानुसार अंमलबजावणी करावी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना प्रतिबंधासाठी त्या-त्या विभागप्रमुखांनी व डॉक्टरांनी आपली भुमिका पार पाडावी. रुग्णांच्या स्वॅब तपासणीच्या नमुन्यांचा अहवाल वेळेत पाठवावा. म्हणजे रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करणे सोयीस्कर होईल.
नवीन अकरा मजली इमारतीत कोरोना रुग्णांना योग्य ते उपचार होण्यासाठी आवश्यक सेवा सुविधांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या सुधारणा गतीने करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. कोरोना विषाणुच्या अनुषंगाने सूसनमध्ये आजवर तपासणी करण्यात आलेले रुग्ण, बाधित रुग्ण, संशयित रुग्ण संख्या, मृत्यू झालेल्या रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी इत्यादी माहितीचे संकलन अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देवून समुपदेशानासाठी तयार करण्यात आलेल्या हेल्पलाईन, पीपीई किट, व्हेंटीलेटर्स, आदींची उपलब्धता, विलगीकरण कक्ष, अतिदक्षता विभाग, आदि विषयांबाबत चर्चा केली, तसेच आवश्यक त्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.