‘दो गज दूरी’ म्हणजेच ‘दोन हातांचे अंतर’ हा कोविड-19 चा सामना करण्यासाठी ग्रामीण भारताने दिलेला मंत्र – पंतप्रधान
पंतप्रधानांच्या हस्ते इ-ग्रामस्वराज ॲप आणि स्वामित्व योजनेचा प्रारंभ
नवी दिल्ली : राष्ट्रीय पंचायती राज्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरच्या सरपंचांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इ-ग्रामस्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपचा तसेच स्वामित्व योजनेचा प्रारंभ केला.
ग्रामपंचायतींना विकासाचे नियोजन करण्यासाठी व ते प्रत्यक्षात आणण्यासाठी इ-ग्रामस्वराजची मदत होणार आहे. या संकेतस्थळामुळे रिअलटाइम म्हणजेच ज्या-त्या क्षणी देखरेख व उत्तरदायित्व सांभाळणे शक्य होणार आहे. ग्रामपंचायत स्तरापर्यंत डिजिटायझेशन म्हणजेच संगणकीय अंकीकरण घेऊन जाण्यासाठी हे संकेतस्थळ म्हणजे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
स्वामित्व योजना सध्या 6 राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली आहे. ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सर्वेक्षण पद्धती वापरून, ग्रामीण भागातील वसतीक्षेत्रे आरेखित करण्याचे काम याद्वारे होणार आहे. शिस्तबद्ध नियोजन, महसुलाचे संकलन, आणि ग्रामीण भागातील मालमत्ता अधिकाराबद्दल एक स्पष्ट कल्पना मिळण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल. या योजनेतून दिल्या जाणाऱ्या ‘टायटल डीड’मुळे मालमत्तेवरून होणारे तंटे व वादविवाद संपुष्टात येतील.
“कोरोना साथरोगामुळे लोकांची कार्यपद्धती बदलली आहे आणि एक चांगला धडाही शिकायला मिळाला आहे. सदैव स्वयंसिद्ध असण्याची शिकवण या आजाराने दिली आहे” असे पंतप्रधानांनी देशभरच्या सरपंचांशी बोलताना सांगितले.
“साथीच्या या आजाराने अनेक नवीन आव्हाने व अकल्पित समस्या उभ्या केल्या, मात्र आपल्याला सर्वांना एक नवा शक्तिशाली संदेशही दिला- आपण स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध झालेच पाहिजे. प्रश्नांची उत्तरे देशाबाहेर शोधता कामा नये, हा सर्वात मोठा धडा आपण शिकलो आहोत.”
“प्रत्येक गाव आपल्या मूलभूत गरज भागविण्याइतके स्वयंपूर्ण असलेच पाहिजे. तसेच, प्रत्येक जिल्हा, त्याच्या पातळीपर्यंत स्वयंपूर्ण असला पाहिजे, प्रत्येक राज्य स्वयंसिद्ध असले पाहिजे आणि सारा देशही त्याच्या पातळीवर स्वयंसिद्ध असला पाहिजे”, असे ते म्हणाले.
गावांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि ग्रामपंचायतींना बळकट करण्यासाठी सरकारने कसून प्रयत्न केल्याचेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
“गेल्या पाच वर्षात जवळपास 1.25 लाख ग्राम पंचायती ब्रॉडबँड सुविधेने जोडल्या गेल्या आहेत, पूर्वी हाच आकडा जेमतेम शंभर होता. तसेच, सामायिक सेवा केंद्रांची संख्याही 3 लाखापलीकडे गेली आहे”, असेही ते म्हणाले.
“मोबाईल फोन्सचे उत्पादन भारतात होत असल्याने, स्मार्टफोनच्या किंमती उतरल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक खेड्यात स्वस्त स्मार्टफोन पोहोचले आहेत. यातून, पुढे, गावपातळीवर डिजिटल पायाभूत सुविधा आणखी भक्कम होऊ शकतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“पंचायतींच्या प्रगतीमुळे निश्चितपणे देशाचा आणि लोकशाहीचा विकास होत जाईल”, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान आणि ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी यांच्यात थेट संवाद घडण्याची संधी आजच्या कार्यक्रमामुळे निर्माण झाली.
व्यक्ती-व्यक्तींमधील उचित सामाजिक अंतर स्पष्ट करून सांगणारा- ‘दो गज दूरी’ म्हणजे ‘दोन हातांचे अंतर’ हा साधासोपा मूलमंत्र सांगितल्याबद्दल, पंतप्रधानांनी सरपंचांशी बोलताना खेडेगावांचे कौतुक केले.
“ग्रामीण भारताने दिलेले – ‘दो गज देह की दूरी’ म्हणजे, ‘दोन हात अंतरावर थांबणे’ हे घोषवाक्य म्हणजे, लोकांच्या शहाणपणाचे व चतुराईचे द्योतक आहे.”अशा शब्दात त्यांनी या घोषवाक्याचे कौतुक केले. या वाक्यामुळे लोकांना उचित सामाजिक अंतर राखण्याची प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले.
“भारताकडे मर्यादित संसाधने असूनही, भारताने हे आव्हान वेळेपूर्वीच चाणाक्षपणे कृती करून समर्थपणे पेलले आहे, आणि नवीन ऊर्जेने व नव्या मार्गांचा अवलंब करून पुढे जात राहण्याचा निश्चय प्रकट केला आहे.”, असे प्रतिपादन त्यांनी केले.
ते म्हणाले, “खेड्यांची सामूहिक शक्ती, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी सहाय्य्यभूत ठरत आहे”.
“असे सगळे प्रयत्न सुरु असताना, आपण याचेही भान ठेवले पाहिजे की, कोणा एकाच्या चुकीमुळे सारे गाव धोक्यात येऊ शकते. म्हणूनच प्रयत्नात शिथिलता येऊन चालण्यासारखे नाही”, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी सरपंचांना केले. तसेच, वृद्ध, दिव्यांग व्यक्ती, आणि गावातील अन्य गरजूंची काळजी घेणे, विलगीकरण, सामाजिक अंतराचे भान, मास्क घालून चेहरा झाकून घेणे- याची काळजीही घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
कोविड -19 च्या विविध मुद्यांबद्दल गावातील प्रत्येक कुटुंबाला अचूक माहिती पुरविण्याचे आवाहन त्यांनी सर्व सरपंचांना केले.
तसेच, आरोग्यसेतू ॲप डाउनलोड करून घेण्याचे आवाहन भारतीयांना करत, आपल्या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती हे ॲप डाउनलोड करेल याची खबरदारी घेण्याचे आदेश पंतप्रधानांनी पंचायत प्रतिनिधींना दिले.
गावातील गरिबांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले जात आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. “आयुष्मान भारत योजनेने’ खेडोपाडी गरिबांना मोठा दिलासा मिळाला असून, या योजनेंतर्गत सुमारे 1 कोटी गरीब रुग्णांना रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळाले आहेत” असेही ते म्हणाले.
ग्रामीण उत्पादनांना अधिक चांगली किंमत व मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी इ-नाम (e-NAM) आणि GEM संकेतस्थळांसारख्या डिजिटल माध्यमांचा उपयोग केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीर, कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि आसामच्या सरपंचांशी संवाद साधला.
महात्मा गांधी यांनी सांगितलेली स्वराज्याची संकल्पना ‘ग्रामस्वराज्यावर’ आधारित होती, असे ते म्हणाले. विज्ञाना संदर्भाने बोलत त्यांनी, एकता हेच सर्व सामर्थ्याचे मूळ स्रोत असल्याचे अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी सर्व सरपंचांना पंचायत राज्य दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. सर्वांचे सामूहिक प्रयत्न, एकभावना आणि दृढनिश्चय यांच्या मदतीने कोरोनावर मात करण्यासाठीही त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.