Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात ६३ लाख ६५ हजार ८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई :  राज्यातील  स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो १ कोटी ५२ लाख १२ हजार ७२४ शिधापत्रिका धारकांना ६३ लाख ६५ हजार ८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा रेशनकार्ड धारकांची संख्या १ कोटी ६० लाख आहे.  त्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे धान्याचे वितरण केले जाते. या योजनेमधून सुमारे २० लाख १२ हजार ५३३ क्विंटल गहू, १५ लाख ५४ हजार ६०४ क्विंटल तांदूळ, तर १९ हजार ९२ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ८ लाख २४ हजार ७९३ शिधापत्रिका धारकांनी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. याअंतर्गत त्यांना राहत्या ठिकाणीच अन्नधान्य पुरवण्यात येते.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी दर महिन्याला ५ किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. दि. ३ एप्रिलपासून एकूण १ कोटी २३ लाख १३ हजार ६३४ रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ वाटप करण्यात आले. या रेशनकार्डवरील ५ कोटी ५९ लाख ५७ हजार ४२५ लोकसंख्येला २७ लाख ९७ हजार ८७० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.

Exit mobile version