पुणे : जिल्हयात उदध्वणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासह आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत दक्ष रहावे, अशा सूचना कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन संजय (बाळा) भेगडे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली हवेली तालुक्यातील कोंढवा व आंबेगाव येथील दुर्घटनेच्या अनुशंगाने उपाययोजनाबाबतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार भिमराव तापकीर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व विभागांनी आपला आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून भेगडे म्हणाले, कोंढवा व आंबेगाव येथील घटनांसारख्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे, कामगारांच्या वास्तव्याची जागा सुरक्षित आहे का, याबाबतची पाहणी करणे आवश्यक आहे, ज्या अधिकऱ्यांंकडून दिरंगाई होईल त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, त्यासोबतच असंघटित कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरासोबतच ग्रामीण भागात अनेक कामगार काम करतात, त्यांच्यासाठी शासनाच्या अनेक सुविधा आहेत, त्या सविधा पुरविण्यासाठी सबंधित विभागाने कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत सर्व विभागांचा समन्वय आवश्यक आहे. ज्या भागात अडचणी आहेत, त्या भागात तातडीने उपाययोजना करा, दोन दिवसाच्या आत बांधकामाची तपासणी करून अहवाल सादर करा, जुन्नर, आंबेगाव भागात दरड कोसळण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी येणा-या कालावधीत दक्ष रहावे, आगामी पावसाच्या कालावधीत दक्ष राहून नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगून ग्रामीण भागातही सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पुलांची पाहणी करून तसा अहवाल सादर करावा, असे सांगून नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत समन्वयाने काम करूया, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.