‘कोरोना’ संकटावर मात करण्यासाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धी आणण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी श्रमप्रतिष्ठेबरोबरच कमावलेले धन समाजासाठी वापरण्याच्या क्रांतीकारक संकल्पना मांडल्या. त्यांनी मांडलेल्या या संकल्पना आजच्या ‘कोरोना’ संकटावर मात करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा बसवेश्वरांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.
समाजातील जातीभेद, लिंगभेद व वर्गभेद हे सारे भेदभाव नष्ट करून मानवधर्माचा स्वीकार करण्यासाठी महात्मा बसवेश्वर यांनी आपले जीवन समर्पित केले. अन्यायाविरुद्ध आवाज उठवून त्यांनी कर्मठ परंपरेला नाकारले. विज्ञानवादी, समतावादी महान तत्त्ववेत्ते, कृतिशील समाजसुधारक म्हणूनही महात्मा बसवेश्वरांची ओळख आहे.
बसवेश्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळ्या व्यवसायांना, विशेषतः ग्रामोद्योगांना, प्रोत्साहन मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला. बाराव्या शतकात त्यांनी केलेले कार्य, त्यांचे विचार आजही प्रेरणा देतात. त्यांनी दिलेली शिकवण मानवी जीवन समृद्ध करणारी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संदेशात म्हटले आहे.