अण्णाभाऊंचा साहित्यिक वारसा पुढे नेणारा सिद्धहस्त, संवेदनशील साहित्यिक हरपला
मुंबई : समाजातील उपेक्षित, वंचित वर्गाच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे केले. त्यांच्या निधनाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा साहित्यिक वारसा पुढे नेणारा महान साहित्यिक हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तम तुपे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, अल्पशिक्षित असूनही उत्तम बंडू तुपे यांनी मराठीमध्ये विपुल लेखन केले. कादंबरी, लघुकथा, नाटक, आत्मकथन अशा अनेक माध्यमातून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाच्या व्यथा-वेदना, जीवन त्यांनी प्रामाणिकपणे मांडलं. ‘काट्यावरची पोटं’ हे त्यांचं आत्मचरित्र समाजातल्या वंचित उपेक्षित घटकांचे प्रतिनिधित्व करणारं आहे. त्यात कमालीचा प्रामाणिकपणा आहे. उपेक्षित, वंचित समाजाच्या दाहक वेदना-व्यथा चित्रित आहेत. त्या चित्रणात वास्तवता, सचोटीची अनुभूती आहे. जीवनसंघर्षाचे वर्णन आहे. ‘झुलवा’ कादंबरीने त्यांना स्वतंत्र ओळख दिली. आज उत्तम तुपे यांच्या निधनाने सिद्धहस्त, संवेदनशील साहित्यिकाला आपण मुकलो आहोत.