पुण्यातील परिस्थिती पाहता खाजगी रुग्णालयाने पुढाकार घेण्याची गरज-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
Ekach Dheya
▪शहतील प्रमुख रुग्णालयाबरोबर झाली बैठक.. ▪उपचार व नियमाप्रमाणे शुल्क अदा करण्यात येईल. ▪मनपाबरोबर करार केला जाईल. ▪भविष्यातील परिस्थिती बघून नियोजन करावे लागणार आहे.
पुणे : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न सुरू असले तरी पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.त्यामुळे शहरातील रुग्णालयांचे मोठे सहकार्य आवश्यक आहे.तेव्हा आपण पुढे येऊन सहभागी व्हावे. रुग्णांच्या उपचाराप्रमाणे व नियमानुसार शुल्क अदा करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात शहरातील प्रमुख रुग्णालयाच्या डॉक्टरांबरोबर बैठक झाली. डॉक्टरांशी चर्चा करताना डॉ.म्हैसेकर म्हणाले,दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येकांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. छोटया -छोट्या बाबी फार महत्त्वाच्या असतात.कोरोना विषाणूची लागण होणार नाही ,याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे.कारण दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे गरजेचे आहे.आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना चांगली सेवा द्या.प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल.
पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुढील काळात डोळ्यांत तेल घालून काम करावे लागणार आहे. सिम्बॉयसिस व भारती विद्यापीठाच्या हॉस्पिटलबरोबर मनपाने करार केलेला आहे. रुग्णांच्या उपचारार्थ शासनाच्या योजनेअंतर्गत निधी मिळेल आणि उर्वरित रक्कम मनपा देईल.फक्त आपल्याकडे आय.सी.यु.बेड किती आहे.शिल्लक किती आहे, याबाबत अद्ययावत माहिती रुग्णालयाने देत राहावी.आलेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये. भविष्याचे नियोजन करून निर्णय घ्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे शहरातील गंभीर परिस्थितीबाबत जाणीव करून दिली.तसेच आरोग्याच्या संबंधाने शासनाच्या योजनेबाबत माहिती दिली. निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ.सुभाष साळुंके यांनी कांही उपयुक्त सूचना केल्या. उपस्थित डॉक्टरांनी कांही सूचना व शंका उपस्थित केल्या.त्यावर बैठकीत निरसन करण्यात आले.