लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध एकाच दिवसात १०३७ गुन्हे दाखल
Ekach Dheya
मुंबई : लॉकडाऊन लागू झाल्यापासून कलम १८८चे उल्लंघन केल्या प्रकरणी काल सायंकाळपासून ते आज दुपारपर्यंतच्या काळात १०३७ नवीन गुन्हे दाखल करण्यात आले असूऩ आतापर्यंत एकूण ७३ हजार ७३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यात २२ मार्चपासून लॉकडाऊनची परिस्थिती आहे. या काळात कोविड १९ च्यासंदर्भात लागू केलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस विभागाने कारवाई केली आहे. आजपर्यंत कोविड १९ च्या अनुषंगाने पोलिसांच्या १०० क्रमांकावर ७८ हजार ४७४ एवढ्या तक्रारी आल्या होत्या. क्वारंटाईनचे उल्लघंन केल्याप्रकरणी ६१० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात कुठेही पोलिसांवर हल्ला झाल्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत.
गेल्या चोवीस तासात अवैध वाहतुकीची नवीन आठ प्रकरणे दाखल झाली असून आतापर्यंत त्यांची संख्या ११०० झाली आहे. नव्या आठ प्रकरणात नव्या ४११ जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ४८ हजार १७७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर २ कोटी ७८ लाख ६४ हजार २९४ रुपये दंड आकारण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.