मुंबई : मुंबई पोलिसांच्या वतीने पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हाती घेण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मंत्री रणजित पाटील, मुंबईचे पोलिस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या योजनांमध्ये सुकन्या योजना (मुलीला शिक्षणासाठी 3000 ते 5000 रूपयांपर्यंत अर्थसहाय्य), आरोग्य कार्ड (औषधी आणि विविध प्रकारच्या चाचण्यांसाठी 5 ते 30 टक्के सवलत), टॉपर अॅप (ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल अॅप), डिजिटल साक्षरतेसाठी संगणक प्रशिक्षण, कायदेविषयक मोफत सल्ला अशा विविध योजनांचा यात समावेश आहे.
मुंबई वाहतूक पोलिस दलातील कर्मचार्यांना यावेळी युव्ही प्रुफ गॉगल्सचे वितरण सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात झाले. सुमारे 2300 पोलिसांना असे गॉगल्स वाटप करण्यात येणार आहेत. पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी या योजनांचा शुभारंभ केला, याबद्दल मुंबई पोलिस दलाची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, आमचे पोलिस दल अतिशय कठीण प्रसंगात काम करते. दिवसांतील 24 तास आणि 365 दिवस ते समाजासाठी कार्यरत असतात. ते कुटुंबीयांना फार वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी अशा योजना हाती घ्यायलाच हव्यात.
पोलिसांना त्यांच्या मालकीची घरे देणे हा माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि यासाठी अनेक उपाय राज्य सरकारने केले. त्यांना व्याजमुक्त कर्ज दिले जात आहे, मुद्रांक शुल्कात सवलती दिल्या आहेत. पोलिस विभागाकडून आलेल्या प्रत्येक कल्याणकारी प्रस्तावाचे स्वागतच आहे. आवश्यकता भासेल तेथे तेथे राज्य सरकार आर्थिक मदत करेल. सेवानिवृत्त पोलिसांना आरोग्याचे फायदे मिळावे, यासाठी त्यांना महात्मा फुले जनारोग्य योजनेत समाविष्ट करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.