राज्यातील वीज दर सरासरी ७ टक्के कमी केला – डॉ. नितीन राऊत
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या तीनही वीज कंपन्या आणि वीज नियामक आयोगामध्ये समन्वय साधून वीजदर कमी करायच्या निर्णयामुळे राज्यात उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते आज झूम ऍपच्या माध्यमातून घेतलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते.
ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्विकारल्यापासून सध्याच्या कोरोना संकट काळात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती डॉ.राऊत यांनी यावेळी वार्ताहरांना दिली. राज्यातील वीज दर सरासरी ७ टक्के कमी केला असल्याचं त्यांनी सांगितलं. औद्योगिक तसंच व्यावसायिक ग्राहकांवर पुढचे ३ महिने स्थिर आकार लागू होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.
घरगुती वापराच्या बिलांचे मीटर रिडींग घेणार नसून गेल्या महिन्याच्या सरासरी बिलावरून वीज देयक तयार केल जाईल असं राऊत यांनी सांगितलं. ग्राहकाशी थेट संपर्क होऊ नये याकरता मिटर रिडींग, वीजबिल वितरीत करणे, वीज बिल भरणा केंद्र, वीज चोरी मोहिम, वीज पुरवठा खंडित करणे इत्यादी प्रक्रिया थांबवल्या आहेत, असंही राऊत म्हणाले.