Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विठुरायाच्या दर्शनाला आषाढी यात्रेच्यानिमित्ताने २४ तास सुरुवात

पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना, पंढरी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहे . आषाढी साठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाच्या दर्शन घेता यावे, यासाठी गुरुवारी देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले करण्यात आले आहे . विठुरायाचे नवरात्र सुरू होत असल्याने  देवाच्या विश्रांतीचा चांदीचा पलंग या नवरात्री काळात काढण्याची परंपरा असल्याने विधिवत पूजा करून हे नवरात्र बसविण्यात आले. सकाळी देवाच्या पूजेनंतर देवाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला असून, आता २४ तास दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाला थकवा जाणवू नये, यासाठि ही व्यवस्था करायची परंपरा आहे.

सकाळी देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला. यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या गिरद्या देखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या. देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले. देवाचे सर्व राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे.

देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता रोज पायावर ५०  हजार तर मुखदर्शनातून ५० ते ६० हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे. सध्या गर्दी वाढू लागल्याने मिनिटाला ४० भाविकांच्या दर्शनाचा वेग आता मंदिर समितीला वाढवावा लागणार असून मुखदर्शन रांगेत देखील जास्तीतजास्त भाविकांना दर्शन देता यावे, यासाठी वेग वाढवावा लागणार आहे. आषाढी यात्रा काळात देवाचे दर्शन घेण्यास १८ ते २० तास अवधी लागत असल्याने सध्या रोज लाखभर भाविक दर्शनासाठी येथे येत असून सध्या ८ ते १० तासात देवाचे दर्शन मिळत आहे. आता २४ तास दर्शन व्यवस्था सुरू झाल्याने, हाच अवधी कमी होऊ शकणार आहे.

Exit mobile version