उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला बारामती तालुक्याचा आढावा
Ekach Dheya
बारामती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यासोबतच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उच्चस्तरीय केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए. के. गडपाले यांनी केल्या. बारामती पॅटर्न तसेच ग्रामीण भागात कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय केन्द्रीय स्तरावरील पथक बारामती तालुक्यामध्ये आज दाखल झाले . या केंद्रीय पथकाने बारामती शहरातील देसाई इस्टेट सिल्व्हर ज्युबिली रूग्णाल येथे भेट देवून पाहणी केली. तसेच कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
शासकीय विश्रामगृहात आरोग्य सेवेचे अतिरिक्त सल्लागार डॉ. ए. के. गडपाले यांच्या अध्यक्षतेखाली साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा घेतला. यावेळी मायक्रोबायोलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक डॉ. व्ही. एस. रंधावा, अनेस्थेशिया आणि गहन काळजी युनिटचे डॉ. अंशु गुप्ता, कम्युनिटी मेडिसीन एबीव्हीआयएमएस आणि आरएमएल हॉस्पिटलचे सहायक प्रा. डॉ. सागर बोरकर उपस्थित होते.
डॉ. गडपाले म्हणाले, बारामती तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अत्यंत समाधानकारक आहेत, बारामती पॅटर्नच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच पाहणी दरम्याण देसाई इस्टेट येथील खुशालचंद छाजेड सभागृहात वॉर्डमध्ये कोरोना प्रतिबंधाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबतची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. कोरोना विषाणूच्या बाबत उपस्थित असलेल्या स्वययंसेवकांच्या शंकाचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन डॉ. ए. के. गडपाले यांनी केले.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुका प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबतची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तालुक्यात साथरोग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस तहसिलदार विजय पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सिल्व्हर ज्युबिली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे, नगरपरिषद मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर उपस्थित होते.