Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोटा येथील विद्यार्थी पुण्यात सुखरूप पोहोचले

पुणे : राजस्थानमधून कोटा येथे असलेले पुण्यातील विद्यार्थी एसटीने आज पहाटे स्वारगेट बसस्थानक येथे सुखरूप पोहोचले. पुण्यात पोहोचल्यावर एकूण 74 विद्यार्थी आणि 8 ड्रायव्हर यांची पुणे महानगरपालिकेच्या तीन पथकांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कोवीड-19ची (कोरोना) संबंधित लक्षणे अथवा आजारी म्हणून कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनगटावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करून घरी पाठवण्यात आले. चौदा दिवसांत आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

राजस्थानमधील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेल्या आणि लॉकडाऊन मुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी धुळे आगाराच्या 70 बसेस पाठविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 4 बसेस होत्या. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उप मुख्य मंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली उप जिल्हाधिकारी अमृत नाटेकर, एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी समन्वय साधून या विद्यार्थ्यांना पुण्यात सुखरूप परत आणले. आज सकाळी धुळे आगाराच्या चारही बसेस निर्जंतुकीकरण करून धुळ्याकडे रवाना करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

Exit mobile version