Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती आरोग्य तपासणीतून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे कॅन्टोनमेंट हॉस्पीटलसाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देणार

पुणे : पुणे कॅन्टोनमेंट क्षेत्रातील मोदीखाना व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना व आरोग्य सुविधाबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली. प्रतिबंधित क्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान वीस नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात यावी तसेच या आरोग्य तपासणीतून कोणताही व्यक्ती सुटणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. तसेच पुणे कॅन्टोनमेंट हॉस्पीटलसाठी साधनसामुग्री व अन्य बाबींसाठी निधीची आवश्यकता असेल तर निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पुणे कॅन्टोनमेंट क्षेत्रातील मोदीखाना व लगतच्या महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण आढळलेल्या हे दोन्ही क्षेत्र प्रतिबंधित केले आहेत. येथे महानगरपालिका व जिल्हा प्रशासनासोबतच पुणे कॅन्टोनमेंटच्या वतीने विविध उपाययोजना करून कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक शोधण्यात येत आहेत. यासोबतच येथील नागरिकांची आरोग्य तपासणी, नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. या सर्व उपाययोजना व आरोग्य सुविधाबाबतची पाहणी व येथील नागरिकांशी जिल्हाधिकारी राम यांनी संवाद साधला. यावेळी पुणे कॅन्टोनमेंटचे स्टेशन कमांडर बिगेडीयर कुलजित सिंग, पुणे कॅन्टोमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डीसीपी सरदेशपांडे, डॉ. गायकवाड आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे कॅन्टोनमेंट हॉस्पीटलसाठी यापूर्वी अडीच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी साधनसामुग्री व अन्य बाबींसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येकाने मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, पुणे कॅन्टोनमेंट व पुणे महानगरपालिकेने आवश्यकतेप्रमाणे मास्कचा पुरवठा तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पूरवठा घरपोहोच करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्यकविषयक सर्वेक्षण करण्यावत यावे, डॉक्टारांनी आवश्यतक ती खबरदारी घेवून रुग्णांची वैद्यकीय तपासणी करावी, वैद्यकीय तपासणीच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी राम यांनी या प्रतिबंधित क्षेत्रातील शौचालयांचा वापर, वैयक्तिक स्वच्छता ठेवा, मास्कचा वापर, निर्जंतूकीकरण आदी विषयाबांबत नागरिकांशी संवाद साधत परिसराची पाहणी केली. यावेळी पुणे कॅन्टोनमेंट, पुणे महानगरपालिका तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version