Site icon साप्ताहिक एकच ध्येय

संकटावर मात करण्यासाठी सर्व हितधारकांनी एकात्मिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे – नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई )आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अनुसूचित जाती -अनुसूचित जमातीतील  (एससी-एसटी) उद्योजकांच्या मालकीच्या एमएसएमईवर कोविड -१९  च्या परिणामाबाबत  दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डीआयसीसीआय) च्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादादरम्यान डीआयसीसीआयच्या प्रतिनिधींनी कोविड -१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर एससी-एसटी एमएसएमईला सामोरे जावे लागत असलेल्या विविध आव्हानांबाबत काही सूचनांसह चिंता व्यक्त केली आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारकडून मदत मागितली.

गडकरी यांनी उद्योगाना कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. त्यांनी पीपीई (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) वापरण्यावर भर दिला आणि कामकाजादरम्यान सामाजिक अंतरांचे निकष पाळण्याची सूचना केली.

निर्यात वाढीवर तसेच परदेशी आयाती ऐवजी देशांतर्गत उत्पादनावर भर देण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, उद्योगानी नाविन्य, उद्यमशीलता,  विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन कौशल्य आणि ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याच्या अनुभवांवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मकता मिळविण्यासाठी उद्योगानी दर्जाशी कोणतीही तडजोड न करता लॉजिस्टिक खर्च, भांडवल खर्च, वीज आणि उत्पादन खर्च कमी करण्यावर भर दिला पाहिजे असे ते म्हणाले.

जपान सरकारने त्यांच्या उद्योगांना चीनमधून जपानी गुंतवणूक काढून इतरत्र हलवण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर केल्याचे गडकरी म्हणाले. ही भारतासाठी एक संधी असून ती साधायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यांनी पुढे नमूद केले की ग्रीन एक्सप्रेस हायवेचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या औद्योगिक क्लस्टर, लॉजिस्टिक पार्कमध्ये भविष्यासाठी  गुंतवणूक करण्याची उद्योगाना ही संधी आहे. मेट्रो शहरांव्यतिरिक्त इतर भागात औद्योगिक क्लस्टरची क्षितिजे विस्तारण्याची  गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आणि उद्योगांना सहभागी होण्याचे आवाहन केले.

डीआयसीसीआयने काही प्रमुख मुद्दे अधोरेखित केले आणि एससी-एसटी उद्योजकांना  दिलेल्या सूचनांमध्ये  कर्जफेडीला  मुदतवाढ, अतिरिक्त जीएसटी सूट, कार्यशील भांडवल कर्जाची मर्यादा वाढविणे, पतपुरवठा सुलभ करणे, विशेष पतसंस्थेशी संबंधित भांडवली अनुदानामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश उद्योगांचे विकेंद्रीकरण इत्यादींचा समावेश आहे.

गडकरी यांनी प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि सरकारकडून शक्य ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी संबंधित विभागांकडे या समस्या मांडणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, सर्व हितधारकांनी संकटावर मात करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे आणि या संकटावर विजय मिळवण्यासाठी  सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन उद्योगाना केले.

नितीन गडकरी यांनी काल फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन (एफएलओ) द्वारा आयोजित एमएसएमई मधील 100 यशस्वी महिला उद्योजकांच्या एफएलओ संकलनाच्या ई-अनावरणप्रसंगी वेबिनारला संबोधित केले. यामध्ये महिला उद्योजकांच्या समस्यांवर  चर्चा करण्यात आली आणि त्यांच्या सूचनाही नोंदवण्यात आल्या.

Exit mobile version