शेतकऱ्यांना पतपुरवठ्यासाठी बँकांबाबत कठोर धोरण आवश्यक – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर
Ekach Dheya
परदेश, परराज्य व इतर जिल्ह्यांत अडकलेल्या नागरिकांसाठीही स्वतंत्र धोरणाची गरज
अमरावती : खरीप हंगामात शेतकरी बांधवांना नियमित पतपुरवठा होणे आवश्यक आहे. सध्याच्या संकटकाळात शेती व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी काही कठोर पावले उचलावीच लागतील. त्यामुळे बँकांनी पतपुरवठ्यात टाळाटाळ करू नये, यासाठी कठोर धोरण आवश्यक असल्याची मागणी पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.
जिल्ह्यातील स्थितीबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महसूल मंत्री श्री. थोरात यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्या म्हणाल्या, शेतकरी बांधवांना खरीप हंगामात कर्ज देताना बँका टाळाटाळ करतात, अशा तक्रारी वारंवार प्राप्त होत असतात. त्यामुळेच असा प्रकार आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा निर्णय आम्ही यापूर्वीच खरीप आढाव्याच्या बैठकीत घेतला आहे. अशी कठोर पावले राज्यभर उचलणे आवश्यक आहे. सध्याच्या संकटकाळात कृषी क्षेत्रासह सर्व व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. आपला देश कृषिप्रधान आहे. बहुसंख्य शेतकरी बांधवांच्या हितासाठी त्यांना खरीप हंगामासाठी कर्ज मिळणे गरजेचे आहे.
अनेकदा राज्य शासनाने निर्देश देऊनही बँका टाळाटाळ करतात. त्यामुळे याबाबत कठोर धोरण राबवून बँकांना सुस्पष्ट इशारा देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, शेतकरी बांधवांची अडवणूक होत असेल तर त्याबाबत बँकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रातील काही नागरिक, विद्यार्थी, परराज्यात अडकले आहेत. इतरही राज्यातील नागरिक महाराष्ट्रात अडकले आहेत. अनेक ठिकाणी परराज्यातील मजूर स्वत:च्या गावी चालत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या काळात लॉकडाऊन असल्याने त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. ते आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. अशा इतर जिल्ह्यातील, परराज्यातील, त्याचप्रमाणे परदेशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी धोरण राबविण्याची गरज आहे.
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी लॉकडाऊनचा कालावधी ईदपर्यंत कायम ठेवण्याबाबत नागरिकांकडून निवेदन प्राप्त झाले आहे. ईदपर्यंत लॉकडाऊन ठेवल्यास उत्सवामुळे नागरिक एकदम बाहेर पडून गर्दी करणार नाहीत, असे निवेदनात नमूद आहे. त्याचा विचार व्हावा, अशी विनंती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी महसूल मंत्री श्री. थोरात यांना केली.