Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अटी आणि शर्तींसह सर्व प्रकारची दुकानं उघडायला राज्य सरकारची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात सर्व प्रकारची दुकानं उघडण्याला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. उद्यापासून ही दुकानं सुरू होऊ शकणार आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची विक्री न करणाऱ्या इतर दुकानदारांनाही आता दुकानं उघडता येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी दिली आहे. या सर्व ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणं बंधनकारक आहे. सध्यातरी या दुकानांच्या वेळेवर कुठलेही निर्बंध नसून महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन यासंदर्भात निर्णय घेऊ शकतील.

महापालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व शहरी भागांमधले मॉल्स, मार्केट मार्केट कॉम्प्लेक्स, बंद राहतील. केवळ निवासी वस्त्या आणि गल्ल्यांमधली दुकानं खुली करायला ही परवानगी असेल. मात्र मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्र तसंच मालेगांव महापालिका क्षेत्रात जर एका गल्लीत किंवा मार्गावर पाचहून अधिक दुकानं असतील तर, जीवनावश्यक वस्तू विकणारी दुकानं वगळता इतर वस्तुंची जास्तीत जास्त ५ दुकानं खुली ठेवता येणार आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रात मात्र केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने खुली राहतील. हरित आणि केशरी क्षेत्रांमध्ये केश कर्तनालय, स्पा देखील सुरू होऊ शकतील. लाल क्षेत्रात मात्र त्यांना परवानगी नाही. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी दवाखाने, रुग्णालयं देखील सुरू करता येणार आहेत. मात्र जीवनावश्यक गोष्टी वगळता इतर कारणांसाठी रात्री ७ ते सकाळी ७ दरम्यान कुणालाही बाहेर पडता येणार नाही. १० वर्षांखालची मुलं, गर्भवती, मधुमेह, रक्तदाब वगैरे आजारांची रुग्ण आणि ६५ वर्षावरच्या ज्येष्ठ नागरिकांनी तर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीही घराबाहेर पडू नये असा सल्ला सरकारनं दिला आहे.

राज्यात सर्वत्र सरकारी, खासगी कार्यालयं आणि कारखाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. हरित आणि केशरी क्षेत्रांमध्ये कार्यालयात पूर्ण उपस्थिती ठेवता येईल तर लाल क्षेत्रातल्या कार्यालयात ३३ टक्के कर्मचाऱ्यांना बोलविला येईल. मुंबई, पुणे, मालेगावात मात्र खासगी कार्यालयं बंदच राहतील असंही राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. सरकारी कार्यालयात ५ टक्के कर्मचारी बोलवायला याठिकाणी परवानगी आहे.

मुंबई, पुणे आणि मालेगाव वगळता इतर ठिकाणी दुचाकीवर एका व्यक्तीला, चार चाकीमध्ये चालकाशिवाय २ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. तर लाल क्षेत्र वगळता इतर ठिकाणी टॅक्सी आणि कॅब वाहतूक  चालकासह २ व्यक्तींना घेऊन सुरू होऊ शकणार आहे.

विमान, रेल्वे, मेट्रो, बस वाहतूक राज्यात सर्वत्र बंदच राहणार आहे. शाळा, कॉलेज, इतर शैक्षणिक संस्था, हॉटेल, मॉल, चित्रपटगृह, जिम, तरण तलाव, मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च आणि इतर धार्मिक स्थळ उघडायलाही अजून परवानगी देण्यात आलेली नाही.

१७ मे पर्यंत कुठलेही सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि अन्य प्रकारचे कुठलेही कार्यक्रम बंदच राहणार आहेत.

दरम्यान ३ मे पर्यंत नागपुरात दुकानं उघडायला ज्या सवलती दिल्या होत्या त्याच १७ मेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यात कुठलीही वाढ करण्यात येणार नसल्याचं नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version