Site icon साप्ताहिक एकच ध्येय

परराज्यात अथवा परजिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुकांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दवाखान्यात गर्दी करु नये : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन

पुणे : दवाखान्यांमध्ये कोरोना लक्षणांचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पर राज्यात जायला इच्छुक कामगार अथवा परजिल्ह्यात जायला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी, कामगार, नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी दवाखान्यात गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. शिवाय परराज्यात 100 अथवा 200 अशा संख्येत गटाने जाणाऱ्या कामगारांची त्यांच्या नजीकच्या ठिकाणी प्रशासनामार्फत वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी म्हटले आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना सुरु करण्यात येणार आहेत, तसेच या भागातील बांधकामे सुरु होत आहेत. त्यामुळे याठिकाणी कामगारांना सोशल डिस्टनसिंग ठेवून काम सुरु करता येणार आहे. शिवाय सध्याच्या परिस्थितीत घरभाडे आकारू नये, अशा सूचना घरमालकांना देण्यात आल्या आहेत.

कामगार ज्या राज्यात जाणार आहेत, त्या संबंधित राज्याची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांना इच्छित स्थळी जायची परवानगी देण्यात येणार आहे. या नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर शासकीय निकषानुसार त्यांना परवानगी मिळेल, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी म्हटले आहे.

Exit mobile version