राज्य सरकारनं दुकानं उघडण्याची परवानगी दिली असली तरी काही जिल्ह्यात निर्बंध कायम
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी दारूच्या दुकानांसह इतर दुकानं उघडायची परवानगी सरकारनं काल जाहीर केली होती. तरी राज्यातल्या काही जिल्हा प्रशासनांनी दारूची विक्री बंदच ठेवायचा निर्णय घेतला आहे. सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलडाणा आणि अमरावती या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
बुलडाणा आणि अमरावती जिल्हा प्रशासनानं मे महिना अखेरीपर्यंत दारू विक्रीवरची बंदी कायम ठेवायचा निर्णय घेतला आहे, तर औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं दारू उत्पादनाला परवानगी दिली आहे, पण विक्रीवरची बंदी कायम ठेवली आहे. नागपूर महानगर पालिकेच्या हद्दीत देखील दारूची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे.
परभणी जिल्हयात सर्व प्रकारची किरकोळ मद्यविक्री 10 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
नाशिकमध्ये कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्यानं नाशिक तसंच मालेगाव महापालिका क्षेत्रांसोबतच सात ठिकाणं लाल क्षेत्र म्हणून कायम असणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे व्यवसाय तसंच शिक्षण संस्थाही सुरु होणार नसल्याचं जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या तालुक्याच्या ठिकाणी एकही कोरोनाबाधित आढळेला नाही अशाच ठिकाणी अटी शर्तींसह काही प्रमाणात व्यवसाय आणि अन्य सोयी सुरु राहतील असं मांढरे यांनी म्हटलं आहे.
उस्मानाबाद जिल्हा हरित क्षेत्र म्हणून घोषित झालं आहे. त्यामुळे जिल्ह्यात परस्परांपासून सुरक्षित अंतराच्या नियम पाळण्याच्या अटींसह सर्व दुकानं आजपासून ठराविक वेळेसाठी सुरु झाली आहेत. जिल्ह्यातली दुध उत्पादनं तसंच भाजीपाला विक्रीला सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत, कृषी विषयक साधनांसाठी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत, तर इतर सर्व आस्थापनं सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.
वाशिम जिल्हा आता कोरोना मुक्त झाल्यानं प्रशासनानं आजपासून टाळेबंदीमध्ये काही सवलती जाहीर केल्या. मात्र या ठिकाणी नागरिकांमध्ये शिस्तीचा अभाव असून अनेक दुकानांमध्ये गर्दी दिसून आल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
लातूर जिल्ह्यात आज ४० दिवसांच्या ताळेबंदीनंतर दुकानं सुरु करण्याची परवानगी मिळाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये उत्साह दिसत आहे. बाजारपेठ सुरु झाल्यानं फळ उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळत आहे.
जिल्ह्यात दारूची विक्री करणाऱ्या दुकानांना मर्यादित वेळेसाठी परवानगी मिळाल्यानं दुकानाबाहेर आज मोठी गर्दी दिसून आली.
रत्नागिरी जिल्ह्यात ताळेबंदीमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली असली तरी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी नियम पाळून दैनंदिन व्यवहार करावेत, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी परभणी जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी काल रात्री एका वाहनामधून पोलिसांनी ११ लाख ३० हजार रुपयांची रक्कम जप्त केली. गाडीच्या चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.