राज्य सरकारने निर्धारित केलेल्या वेळेतंच सर्व दुकानं सुरू राहणार, स्थानिक अधिकाऱ्यांनी वेगळ्या वेळा ठरवू नये, राज्य सरकारचे आदेश
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं निर्धारित करून दिलेल्या वेळेत आणि निर्देशांनुसार राज्य भरातली जीवनावश्यक वस्तूंची आणि इतर दुकानं सुरू राहणार आहे. ही दुकानं ‘दुकानं आणि आस्थापना नियमानुसार’ सुरू राहतील. गरज असल्यास महापालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकारी दुकानांच्या वेळा बदलण्यासाठी निर्णय घेतील. इतर अधिकाऱ्यांनी दुकानांच्या वेळा बदलण्याचे आदेश देऊ नये असे आदेश राज्य सरकारने आज प्रसिद्ध केले.
प्रतिबंधित क्षेत्रात फक्त संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी आवश्यकतेनुसार अटी लागू करु शकतील. पण इतर कोणत्याही विभागानं किंवा अधिकाऱ्यानं दुकानांवर स्वतंत्र अटी, शर्ती लादू नये असं सरकारनं सांगितलं आहे.
नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा आणि अन्य वस्तूंचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी विविध झोनमध्ये दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण काही ठिकाणी स्थानिक अधिकारी दुकाने उघडी ठेवण्याचे दिवस अथवा वेळा नियंत्रित करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्राहकांचा गोंधळ होऊन दुकाने उघडल्यानंतर गर्दी होत असल्याचे दिसते. त्यामुळे राज्य शासनाने आज यासंदर्भात स्पष्टीकरण जारी केले आहे.