Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत 24 मजूर राजस्थानकडे रवाना

पुणे : जिल्ह्याच्या व राज्याच्या विविध भागातून मजुरांचे पायी चालत जावून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

या उपाययोजनांचा एक भाग म्हणून मुळशी तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायत क्षेत्रात मिळेल ते काम करणा-या राजस्थान येथील मजुरांना जिल्हा प्रशासनाने राजस्थानला जाण्यासाठी बसचे नियोजन केले. प्रशासनाचे नियोजन, सोशल डिस्टंसिंगचे अत्यंत काटेकोर पालन करत वैद्यकीय तपासणी केलेल्या या 24 मजुरांना आज दुपारी बसने राजस्थानकडे रवाना करण्यात आले. यावेळी तहसिलदार अभय चव्हाण, मंडळ अधिकारी सुहास कांबळे, तलाठी पासलकर व पिरंगुट ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुळशी तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायत क्षेत्रात मिळेल ते काम करुन आपली उपजीविका भागविण्यासाठी कार्यरत असलेले राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील 24 मजुरांना आज त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने मजुरांसाठी निवारागृहे उभारली आहेत. लॉकडाऊन कालावधीत अनेक मजुरांना निवारा गृहांचा आधार मिळत आहे.

तिस-या टप्प्यातील लॉकडाऊनमधे काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने आपल्या हाताला इथे रोजगार मिळेल, त्यामुळे आपण इथे राहू शकता, अशी विनंती प्रशासनाने मजुरांना केली. मात्र, मजुरांनी आजपर्यंत केलेल्या व्यवस्थेबाबत प्रशासनाचे आभार मानत गावाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. मजुरांच्या इच्छेवरून प्रशासनाने सर्व मजुरांची पिरंगुट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी व कागदपत्रांची पूर्तता करुन राजस्थान सरकारची परवानगी व जिल्हाधिकारी, पुणे यांची परवानगी घेत मजुरांसाठी बाडमेर जिल्ह्यातील आपल्या गावी जाण्यासाठी बसचे नियोजन केले. आज दुपारी ही बस मजुरांना घेवून राजस्थानकडे रवाना झाली.

Exit mobile version