नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना टप्प्याटप्प्यानं मायदेशी परत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. येत्या ७ मे पासून विशेष विमानं आणि जहाजानं या नागरिकांना भारतात आणलं जाईल, तसंच त्यांच्याकडून या प्रवासाचं शुल्कही घेतलं जाईल असं केंद्रीय गृहमंत्रालयानं या संदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
प्रवासापुर्वी तपासणी केल्यानंतर ज्यांना कोरोनाची लक्षणं नसतील त्यांनाच भारतात आणलं जाणार आहे. प्रवासादरम्यान सर्वांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशांचं पालन करावं लागेल, तसंच आरोग्य सेतू अॅपही सुरु करावं लागणार आहे.
भारतात परतल्यानंतर या सर्वांची पुन्हा तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवलं जाणार आहे. हे सर्वजण भारतात परतल्यानंतर त्यांची तपासणी आणि क्वारंटाईनसाठी राज्य सरकारनं योग्य तयारी करावी असंही या आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान ६४ विमानांतून सुमारे १४ हजार ८०० भारतीयांना परत आणलं जाईल, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. यापैकी दहा विमानं संयुक्त अरब अमिरातीला, अमेरिका, इंग्लंड, मलेशिया आणि बांग्लादेशला प्रत्येकी सात, सौदी अरब, कुवैत, फिलिपाईन्स आणि सिंगापूरला प्रत्येकी पाच, तर ओमान, बहारिन आणि कतार देशातल्या भारतीयांना आणण्यासाठी दोन विमानं जाणार असल्याचं, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं सांगितल्याचं, या बातमीत म्हटलं आहे.
या ६४ पैकी पंधरा विमानं केरळमधून, दिल्ली तसंच तमिळनाडूतून प्रत्येकी अकरा, महाराष्ट्र तसंच तेलंगणातून प्रत्येकी सात तर उर्वरित विमानं इतर पाच राज्यातून उड्डाण करणार असल्याची माहिती पीटीआयनं दिली आहे.