स्थलांतरीत कामगारांना प्रवासासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार
Ekach Dheya
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जावू इच्छिणारे स्थलांतरीत कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापुर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे.
यासंदर्भात आज जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, प्रवास करु इच्छिणारे स्थलांतरीत कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांची प्रवास सुरु होण्यापुर्वी डिजीटल थर्मामीटरच्या सहाय्याने तपासणी आणि सिम्टोमॅटीक एक्झामीनेशन (रोगलक्षणात्मक तपासणी) होणे गरजेचे आहे. शासकीय तसेच महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत ही वैद्यकीय तपासणी पुर्णत: मोफत केली जाईल. किंवा महापालिकांकडून याकामी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा घेता येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, तपासणी करण्यात आलेल्या आणि एन्फ्लुएन्जासारखा कोणताही आजार न दर्शविणाऱ्या व्यक्तिंची एकत्रीत यादी प्रमाणीत करुन वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत जारी करण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही, असेही आजच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या यादीतील व्यक्ती प्रवास करु शकतील.