Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आठवडाभरापासून देशातल्या १८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या ७ दिवसात १८० जिल्ह्यांमधे कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तर १६४  जिल्हे असे आहेत जिथे गेल्या १४ ते २० दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तसंच १३६ जिल्ह्यांमधे गेल्या २१ ते २८ दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.

अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, गोवा, झारखंड हिमाचल प्रदेश जम्मू -काश्मीर, केरळ, लडाख आणि ओदिशासह १३ राज्ये आणि केंद्र शासीत प्रदेशांत गेल्या २४ तासात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल ३ हजार ५६१ ची भर पडली तर ८९ जणांचा मृत्यू या आजाराने झाला.

आतापर्यंत देशात ५२ हजार ९५२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून १ हजार ७८३ जणांचा मृत्यू झाला आहे. ३५ हजार ९०२ रुग्णांवर उपचार सुरु असून १५ हजार २६६ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता २८ पूर्णांक ८३ शतांशांपर्यंत वाढलं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

कोविड-१९ मुळे गेल्या २४ तासांत राज्यात ३४ जण मरण पावले. एका दिवसात सर्वाधिक एक हजार २३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण काल आढळल्यानं राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ हजार ७५८ झाली आहे. राज्यात आतापर्यंत या आजारानं ६५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

उपचार घेतल्यानंतर ३ हजार ९५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत गेल्या चोवीस तासात ७५९ नवीन रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांचा आकडा १० हजार ५२७ झाला आहे. धारावीत ६८ नवे रुग्ण आढळले आहेत. काल १५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या २२८७ झाली आहे. तर काल २५ जणांचा मृत्यू झाला असून, मृत रुग्णांची संख्या ४१२ झाली आहेत.

Exit mobile version