नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना, राज्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ३ लाख ८१ हजार ९३० लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. राज्याचे मनरेगा आयुक्त ए.एस.आर. नायक यांनी ही माहिती दिली.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक तसंच सामूहिक स्वरुपाच्या एकूण ३५ हजार कामांना प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता दिल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामं उपलब्ध झाली आहे.या कामांवर १४ लाख मनुष्यदिन रोजगारनिर्मिती झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.
तालुकास्तरावर मागणीनुसार कामांचं नियोजन केलं आहे. राज्यात विविध प्रकारची ७ हजार कामं पूर्ण झाली असून आतापर्यंत मजुरीपोटी ४० कोटी रुपयाचे वाटप पूर्ण झाले आहे. इतर कामांवर ७८ कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती नायक यांनी दिली.