उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद
मार्गदर्शक सूचना आणि विद्यार्थीहित डोळ्यासमोर ठेऊन परीक्षेसंदर्भात अंतिम निर्णय
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सध्या लॉकडाऊन कालावधी सुरू आहे. त्या अनुषंगाने युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानुसार सर्व पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या दिनांक १ जुलै ते ३० जुलै या दरम्यान घेण्यात येतील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.
राज्यातील विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेसंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेजवरून आज विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला.
श्री. सामंत म्हणाले, समितीने दिलेल्या अहवालाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेण्यात येत आहे. जर राज्यात कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली व लॉकडाऊन कालावधी वाढला तर पुन्हा एकदा दि. २० जूनपर्यंत या विषयी फेरआढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
समितीने केलेल्या शिफारशीनुसार ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. हा प्रवेश देताना त्यांचे ग्रेड्स व मार्क्स ही त्यांना दिले जातील. मार्क्स देण्याची पद्धती ही विद्यार्थ्यांना मिळणारी ५० टक्के ग्रेड ही अंतर्गत मुल्यमापनावर आधारीत व ५० टक्के या पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण यावरून ठरणार आहे. पूर्वीच्या परीक्षा किंवा सत्रांचे गुण उपलब्ध नसल्यास वार्षिक सत्राच्या पहिल्या वर्षांच्या परीक्षांच्या बाबत १०० टक्के अंतर्गत मूल्यमापन करण्यात येणार आहे. या गुणांबाबत काही शंका असल्यास तसेच त्यामध्ये मुल्यवर्धन करण्याची विद्यार्थ्याची इच्छा असल्यास त्यास ऐच्छिक परीक्षा देता येणार आहे. अशा प्रकारच्या परीक्षांबाबत विद्यापीठ स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे.
तसेच दुर्दैवाने जर एखादा विद्यार्थी या परीक्षांमध्ये नापास झाला तर त्यालाही पुढील वर्षात प्रवेश दिला जाईल पण, त्यांना नापास झालेल्या विषयांची परीक्षा द्यावी लागेल. या विषयीचे वेळापत्रकाचे निर्णय ही विद्यापीठ स्तरावर घेण्यात येणार आहेत. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही हाच नियम लागू असणार आहे. हा निर्णय घेत असताना कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही याची पूर्ण दक्षता येईल, असेही श्री. सामंत यांनी संगितले.
विद्यार्थी व पालक यांच्या शंकाचे निरासन करून त्याच्या सामुपदेशनासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र स्थापन करण्यात येईल.
अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी १ जुलै ते ३० जुलै दरम्यान परीक्षा होणार आहेत असे नजरेसमोर ठेऊन अभ्यास सुरू करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत त्यांनीही सुट्टी आहे, अभ्यास नाही म्हणून घरा बाहेर न पडता घरातच रहावे.
उन्हाळी सुट्टीबाबत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचा विचार करून प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार शैक्षणिक वर्ष हे दि. १ सप्टेंबर पासून सुरू करावयाचे आहे. त्या दृष्टीने उच्च व तंत्रशिक्षण विभाग काम करत आहे. समितीने दिलेल्या या अहवालास सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी सहमती दर्शवली आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये उपस्थित होते असे गृहीत धरूनच त्यांची उपस्थित गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता कोणत्याही प्रकारच्या संभ्रमास बळी पडू नये व आपल्या अभ्यासावर व शैक्षणिक सत्रांवर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहनही श्री.सामंत यांनी यावेळी केले.
● स्वायत्त विद्यापीठांनाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निर्देशाप्रमाणे याच फॉरमॅटद्वारे परीक्षा घ्याव्या लागणार आहेत.
● चार वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ आठव्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच पाच वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ १० व्या सेमिस्टरची परीक्षा द्यावी लागेल.
● ज्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा वार्षिक होतात, त्यांच्या केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थांची परीक्षा घेण्यात येईल.
● दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या केवळ चौथ्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा होईल.
● गोंडवाना विद्यापीठ हे हिरव्या पट्ट्यामध्ये (ग्रीन झोन) येत असल्यामुळे तेथील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत मुभा दिली आहे. या विद्यापीठांतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे येतात. येथील भोगोलिक परिस्थिती पाहून विद्यापीठ स्वतःच्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेईल.
● एसएनडीटी विद्यापीठाच्या राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा या वेळापत्रकानुसारच होतील इतर राज्यातील त्याच्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार होतील.
● उन्हाळी सुट्टीबाबत सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा विचार करून संबंधित विद्यापीठ अंतिम निर्णय घेईल.
● नवीन शैक्षणिक वर्ष हे १ सप्टेंबर पासून सुरू करण्यासाठी सर्व परीक्षांचे निकाल हे दि.१५ ऑगस्ट पर्यंत लावण्यात येतील.
● सामाईक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) बाबतीत येत्या ८ दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येईल.
● पदविका, पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा जर महाविद्यालयात घेता आल्या नाहीत तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जर्नल किंवा ऑनलाईन ओरल घेऊन गुणांकन केले जाईल.