नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेनं शहराच्या ७ झोन्समधे अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केली आहे. १७ मेपर्यंत कोरोना संसर्गाच्या प्रसाराचा दर खाली आणण्यासाठी ते काम करतील. कोरोनाबाधितांचा ठावठिकाणा शोधून काढणं, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं, प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊन आणि कोविड १९ नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करणं, घरोघरी भेट देऊन पाहणी करणं, विकलांग स्थितीतल्या जेष्ठ नागरीकांना शोधून काढणं आणि फीवर क्लिनिक्सची देखभाल या प्रमुख जबाबदाऱ्या या अधिकाऱ्यांवर सोपवल्या आहेत.
खासगी रुग्णालयं, उपचार आणि शुश्रुषा गृहांमधे चाचणी तसंच उपचारांची सोय उपलब्ध करुन घेणं, आणि कोविड केअर सेंटर्सची निर्मिती ही कामंही त्यांनी करायची आहेत. या अधिकाऱ्यांनी आपापल्या झोनला दररोज दुपारी २ वाजेपर्यंत प्रत्यक्ष भेट द्यावी आणि ३ नंतर कार्यालयात काम करुन ६ वाजता आयुक्तांना माहिती सादर करावी असं या आदेशात म्हटलं आहे.