देशातल्या कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधे काल कोविड19 चा एकही नवा रुग्ण आढळला नाही. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण आता ३१ पूर्णांक १५ शतांश टक्के झालं असून काल दिवसभरात १ हजार ५११ रुग्ण बरे झाले, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे.
काल देशभरात ४ हजार २१३ नवे रुग्ण आढळले तर ९७ जणांचा कोविड19 ने मृत्यू झाला. कोरोना बाधितांची एकूण संख्या ६७ हजार १५२ झाली आहे. देशात आतापर्यंत २ हजार २०६ जणांचा कोविड19 ने मृत्यू झाला. सध्या ४४ हजार २९ रुग्णांवर उपचार सुरु असून २० हजार ९१६ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.
राज्यात काल एक हजार २७८ नवे कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले तर दिवसभरात ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये १९ मुंबईतले तर १४ मालेगावमधले आहेत. राज्यात आता एकूण रूग्णांची संख्या २२ हजार १७१ एवढी झाली आहे. आतापर्यंत ८३२ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात १०६ अधिकाऱ्यांसह तब्बल एकूण १ हजार ७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत सात पोलिसांचा कोरोनामुळे उपचाराने दरम्यान मृत्यू झाला तर, ११३ पोलीस उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९१ अधिकारी आणि ७९६ कर्मचारी अशा एकूण ८८७ पोलिसांवर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.