पुणे जिल्हयात प्रवेश करणा-या नागरिकांची वैद्यकीय तपासणी अनिवार्य – जिल्हाधिकारी राम
Ekach Dheya
पुणे : सद्यस्थितीत लॉकडाऊन मुळे परराज्यात व महाराष्ट्रातील विविध जिल्हयात अडकलेल्या स्थलांतरित मजूर व इतर नागरिक बस, रेल्वे तसेच खाजगी वाहनाने प्रवास करुन पुणे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणुचे संशयित रुग्ण प्रवास करुन आलेल्या प्रवाशांमधून आढळ होण्याची शक्यता आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुच्या संसर्गात अधिक वाढ होवु न देता तात्काळ उपाय योजना आखणे आवश्यक आहे. तरी प्रवास करुन आलेल्या सर्व प्रवाशांची तालुक्यांच्या / गावांच्या सीमेवर वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य आहे. सदर संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भ्वू नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये सर्व उपविभागीय अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांना पुणे जिल्हयात परराज्यातून व महाराष्ट्रातील विविध जिल्हयातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांची तालुक्याच्या / गावाच्या सीमेवर चेकपोस्ट तयार करुन त्या ठिकाणी सर्व विभागांच्या संयुक्त पथकामार्फत तपासणी करण्यात यावी. तपासणी दरम्यान कोणतीही कोरोना विषाणूची लक्षणे नसल्यास संबंधितांच्या हातावर होम क्वॉरंटाईन असा शिक्का मारुन त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात यावे.
ज्या ठिकाणी प्रवास करुन आलेल्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन करणे कौटुंबिक कारणाने शक्य नसल्यास अशा प्रवासी नागरिकांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात यावे. वैद्यकीय तपासणी दरम्यान कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्यास संबंधित प्रवासी नागरिकांना कोव्हिड तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात यावे. होम क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या प्रवासी नागरिकांना घरगुती विलगीकरणा दरम्यान कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्यास त्यांना तात्काळ कोव्हिड तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात यावे. प्रवास करुन आलेल्या सर्व नागरिकांना विलगीकरणा दरम्यान आरोग्यविषयक सर्व काळजी घेण्याबाबतच्या सूचना देण्यात याव्यात, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
आदेश व परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. पुणे जिल्हयातील सर्व तालुक्यात प्रवास करुन आलेल्या नागरिकांची स्वतंत्ररित्या नोंद ठेवण्यात यावी. तालुक्यात आलेल्या नागरिकांची माहिती दररोज तालुक्यातील आरोग्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. सर्व माहिती नियंत्रण कक्षाला कळविणेत यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांनी विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने सर्वसाधारणपणे जबाबदारी देण्यात आलेली आहे. तरी आदेशाची सर्व विभागांच्या संयुक्त पथकामार्फत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. परराज्यातून व महाराष्ट्रातील विविध जिल्हयातून प्रवास करुन आलेला कोणताही प्रवासी चेक पोस्टवर नोंदणीशिवाय प्रवेश करणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व संबंधित यंत्रणा अधिकारी यांनी देण्यात आलेल्या जबाबदारीनुसार कार्यवाही करावी. तसेच, नियुक्त अधिका-यांनी त्यांचे अधिनस्थ मनुष्यबळ व साधन सामुग्रीचा जबाबदारीच्या अनुषंगाने आवश्यक ती यथोचित वापर करुन त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदार पार पाडावी, अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.