Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला देशातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गा विरुद्धच्या लढ्याकरता देशाला समतोल धोरण तयार करावं लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशाच्या गावखेड्यांमधे कोरोनाचा शिरकाव होऊ न देणं हे आज सर्वात मोठं आव्हान असल्याचं ते आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना म्हणाले.

कोविड19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावल्यानंतर विडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी घेतलेली ही पाचवी बैठक होती. कोविड 19 चा विरुद्ध भारतानं उभारलेल्या लढाईची साऱ्या जगानं प्रशंसा केली आहे, असं सांगून या लढ्यात राज्यसरकारांनी बजावलेल्या  कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं.  या लढाईची पुढची दिशा समतोल राखण्याच्या दृष्टीनं राज्यसरकारांनी केलेल्या सूचनांचा विचार सर्वसमावेशक धोरणात केंद्रसरकार करेल असं ते म्हणाले.

जिथं लॉकडाऊनच्या अंमलबजावणीत त्रुटी राहील्या आणि सोशल डिस्टन्सिंग ही काटेकोरपणे पाळलं गेलं नाही तिथं अडचणी आणखी गंभीर झाल्या असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. दरम्यान ३१ मे पर्यंत रेल्वे आणि विमानसेवा सुरू करु नये अशी मागणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली. तर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची मागणी केली.

Exit mobile version