मुंबई : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी ५ किलो मोफत तांदळाचे माहे मे महिन्याचे वाटप तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह १ किलो डाळ या परिमाणात ( तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ १ किलो या कमाल मर्यादेत ) माहे एप्रिल व मे महिन्याची एकूण २ किलो मोफत डाळीचे वाटप आजपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती कैलास पगारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी दिली आहे.
चार मेपासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे मे महिन्याचे नियमित ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रतिमाणसी रुपये २ प्रति किलो दराने गहू व रुपये ३ प्रति किलो दराने तांदूळ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य प्रति शिधापत्रिका रु . २ प्रति किलो दराने गहू व रु . ३ प्रति दराने तांदूळ वितरित करण्यात येत असून आतापर्यंत ५१ % शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे .
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये ५९००० / – पेक्षा जास्त व रूपये १ लाखापर्यंत असणाऱ्या एपीएल ( केशरी ) शिधापत्रिकाधारकांना गहू रू . ८ / – प्रति किलो व तांदूळ रू . १२ / – प्रति किलो या दराने प्रति माह प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्याचे मे महिन्याचे वितरण दिनांक २४ एप्रिलपासून सुरू करण्यात आले असून सदर अन्नधान्याचे वितरण मे महिन्यातही सुरु राहील . आतापर्यंत तांदूळ २४९४ मेट्रिक टन आणि गहू ३४४३ मेट्रिक टन इतक्या अन्नधान्याचे २० % शिधापत्रिकाधारकांना वितरण पूर्ण करण्यात आले आहे .
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशीलाबाबत शासनाच्या http : //mahaepos.gov.in या वेबसाइट वरील Rc Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या १२ अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी . याबाबत तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक ०२२ – २२८५२८१४ तसेच ई – मेल dycor.ho.mum @ gov.in यावर तक्रार नोंदवावी . जर अधिकृत शिधावाटप दुकानदाराने त्यानुसार अन्नधान्य न दिल्यास त्याच्याविरूध्द कडक कार्यवाही करण्यात येईल .
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) शिधापत्रिकाधारकांनी स्वत : हून त्यांचे धान्य सोशल डिस्टन्सिगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन प्राप्त करुन घ्यावे .
राष्ट्रीयअन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) तसेच एपीएल ( केशरी ) शिधापात्रिकाधारक यापैकी एकही शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वचिंत राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत . अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी शिधावाटप दुकाना समोर गर्दी करु नये , असे आवाहन कैलास पगारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी केले आहे.