Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामपंचायतींच्या बैठका घेण्यास संमती देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन त्या घेण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीशी संबंधित कामकाज आहे, त्या टप्प्यावर स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने १७ मार्च २०२० रोजी आदेश दिले होते. तथापि, राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये आधीच्या सरपंच, उपसरपंचांचे राजीनामे झाले आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये आता नवीन सरपंच, उपसरपंचांची निवड करावयाची आहे. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातून याबाबत विचारणा होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच यांच्या राजीनाम्यामुळे किंवा इतर कारणाने ही पदे रिक्त झाली आहेत, त्या ग्रामपंचायतींमध्ये या पदांची निवड होण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, यासाठी संबंधित तहसीलदारांना निर्देश देण्यात यावेत व सरपंच, उपसरपंच पदांची निवड करण्यात यावी. तसेच या बैठका घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत, असे मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले. यासंदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

Exit mobile version