गर्दी, संपर्क व संसर्ग टाळणे भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा
Ekach Dheya
निर्णयाची अंमलबजावणी 15 मे पासून – आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती
मुंबई : कोविड -19 चा संसर्ग जगभरासह देशात आणि राज्यात वाढला असल्याने 22 मार्च 2020 पासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉक डाऊनमुळे अत्यावश्यक वस्तुखेरीज सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र 4 मे 2020 पासून किरकोळ मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू काही ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकानात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 15 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
सदर निर्णय राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 139 अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश 11 मे 2020 रोजी निर्गमित केला आहे.या आदेशाबाबत क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांना याबाबत करावयाच्या कारावाईबाबत आदेश देण्यात आले आहेत. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी 14 मे 2020 पासून सकाळी 10 वाजल्यानंतर करण्यात येणार होती. परंतू क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून सदर आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय मिळविणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, ओळखपत्र देणे इत्यादी प्राथमिक तयारीसाठी आणखी एक दिवस आवश्यक असल्याने या आदेशाची अंमलबजावणी 15 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात येणार आहे.
घरपोच मद्यसेवा ही सोय ज्या जिल्ह्यात मद्यविक्री सुरु आहे त्या जिल्ह्यात आणि संबधित जिल्हाधिकारी यांनी मद्यविक्री करीता ज्या वेळा, दिवस आणि क्षेत्र निर्धारित केलेले आहे त्यातच सदर सोय उपलब्ध होऊ शकते.