नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड १९ चे ३ हजार ५२५ नवे रुग्ण आढळले तर १२२ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता ७४ हजार २८१ झाली असून ४७ हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आजारातून बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ३८६ आहे तर मृतांची संख्या २ हजार ४१५ झाली आहे. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण आता ३२ पूर्णांक ८३ शतांश टक्के झालं आहे.
राज्यात काल एक हजार २६ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून राज्यातल्या बाधीतांचा आकडा २४ हजार ४२७ वर पोचला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं राज्यात काल ५३ रुग्ण दगावले असून एकूण मृतांचा आकडा ९२१ झाला आहे.
काल ३३९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ५ हजार १२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासात ४२६ नवीन कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
त्यामुळे बाधीतांचा आकडा १४ हजार ७८१ झाला आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासात २६ रुग्णांना कोविड १९ मुळं प्राण गमवावा लागला असून आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ५५६ झाली आहे.
गेल्या चोवीस तासात दोनशे तीन रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत. मुंबईत आतापर्यंत ३ हजार ३१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. औरंगाबाद शहरात दोन कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला, त्यामुळे शहरातल्या एकूण मृतांची संख्या १७ झाली आहे.
अहमदनगर शहरात आज एका त्रेपन्न वर्षाच्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना विषाणू बाधितांचा आकडा पंच्चावन्न झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढतच असून काल विविध भागातलल्या आणखी पाच जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले. त्यामुळे बाधीतांची संख्या आता ७१० झाली आहे. यात मालेगाव मधीलच ५५३ बाधीत रूग्ण आहेत. नाशिक महापालिका हद्दीत चाळीस तर उर्वरीत अन्य तालुक्यातले आहेत.
शासनानं कोरोना बाबत जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार काल एकाच दिवसात 154 रुग्णांना लक्षणं नसल्यानं घरी पाठवण्यात आलं आहे. नाशिक इथं मालेगाव बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांपैकी नाशिक शहरमध्ये राहणारे पंधरा पोलीस कोरोनाबधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
तसंच अमरावतीचे दोन आणि नाशिक मुख्यालयातला एक असे राज्य राखीव पोलीस दलाचे तीन जवान कोरोनाबधित आढळल्यामुळे पोलीस दलातील कोरोनाबाधितांची संख्या आता अठरा झाली आहे.
सोलापुरातल्या कोरोनाबाधिताची संख्या आता 277 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 19 इतकी झाली आहे. आज दोघा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात हिवरा तांडा इथल्या कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या 28 पैकी 23 व्यक्तींना या विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
लातूरमधल्या उदगीर इथल्या एका व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं आज स्पष्ट झालं. सांगली जिल्ह्यात आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. सध्या एकूण १२ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यात ४१ रुग्ण पाँझिटिव्ह आढळून आले, उपचारानंतर त्यातले अनेकजण बरे झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात काल नवे ११ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रूग्णसंख्या ६३ झाली आहे.
पालघर जिल्ह्यात मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या मेंढवन खिंडीत आज एका कारला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.