Site icon साप्ताहिक एकच ध्येय

1948 च्या ‘वंदे मातरम्‌’ चित्रपटाचे दुर्मिळ फुटेज भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे

पु.ल.देशपांडे यांचा हार्मोनियम वाजवतांनाचे फुटेजही समर्पित

मुंबई : 1948 साली आलेल्या ‘वंदे मातरम्’ या मराठी चित्रपटाचे दुर्मिळ फुटेज भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा भाग बनले आहे. या चित्रपटात प्रसिद्ध लेखक आणि नाटककार पु.ल.देशपांडे यांनी पत्नी सुनिता देशपांडे यांच्याबरोबर आघाडीची भूमिका केली होती. सुमारे 35 मिनिटांचे फुटेज असलेली व्हीएचएस कॅसेट सुनिता देशपांडे यांचे भाचे दिनेश ठाकूर आणि चित्रपट अभ्यासक सतिश जकातदार यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सोपवली. यामधे पु.ल.देशपांडे यांचे हार्मोनियम वाजवतांनाचे चित्रिकरणही आहे.

हे फुटेज हरवले होते, असे आम्हाला वाटत होते, मात्र ते मिळाल्यामुळे अतिशय आनंद झाल्याचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी सांगितले. पु.ल.देशपांडे आणि सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात असतांना हे फुटेज मिळणे, हा सुखद योगायोग असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राम गबाळे यांनी केले होते.

या चित्रपटाचे उर्वरित फुटेजही सापडेल अशी आम्ही आशा करतो, असे सांगून मगदुम यांनी सर्व चित्रपट रसिकांना दुर्मिळ चित्रपटांची फुटेजेस्‌, पोस्टर्स, गाण्यांच्या पुस्तिका, छायाचित्रे संग्रहालयाला दान करण्याचे आवाहन केले. जेणेकरुन भावी पिढ्यांसाठी त्यांचे जतन केले जाईल.

‘वंदे मातरम्‌’ हा चित्रपट अतिशय महत्वाचा मानला जातो. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर आधारीत या चित्रपटाची कथा असून, प्रख्यात लेखक ग.दि.माडगुळकर यांनी या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गाणी लिहिली होती. प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांनी संगीत दिले होते. स्वातंत्र्यानंतर वर्षभराने हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘वेद मंत्राहून वंद्य……’ सारखी गाणी खूप गाजली होती आणि आजही ती लोकांच्या स्मरणात आहेत.

पु.ल.देशपांडे आणि सुनिताबाई यांची स्क्रिनटेस्ट पुण्यात झाली होती. त्या चित्रपटाचे चित्रिकरण कोल्हापूरमधल्या शालिनी स्टुडिओत 1948 च्या पुर्वाधात झाले होते. पु.ल.देशपांडे यांची अभिनेता म्हणून ही पहिलीच स्क्रिनटेस्ट होती. यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटात अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, संगीतकार म्हणून योगदान दिले. चित्रपटाचे कॅमेरामन आगाशे यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता.

1980 मधील पु.ल.देशपांडे यांचा हार्मोनियम वाजवतांनाचे फुटेज असलेल्या सुमारे एक तासाच्या दोन यु-मॅटिक कॅसेट्स आहेत. एका फुटेजमधे पु.ल.देशपांडे यांच्या प्रसिद्ध ‘वाऱ्या वरची वरात’ नाटकात काम केलेले लालजी देसाई त्यांना तबल्यावर साथ देत आहेत. तर दुसऱ्या कॅसेटमधे झावबा तबल्यावर आहेत. 1980 मधे मुंबईत याचे चित्रिकरण झाले असावे, असे मानले जात आहे. संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अन्य सामुग्रीमधे पु.ल.देशपांडे यांच्या आवाजातील त्यांच्या स्वत:च्या विनोदी पात्रांचे संवाद आहेत.

तीन वर्षांपूर्वी ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाचे मुळ हस्तलिखित कथा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला सुपूर्द करण्यात आली होती. या चित्रपटात पु.ल.देशपांडे यांनी अभिनय, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संगीत या सर्व भूमिका पार पाडल्या होत्या.

Exit mobile version