Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या उपाययोजनांची दोन्ही नेत्यांनी तुलनात्मक माहिती घेतली. संसर्गात कोणतीही वाढ होऊ न देता लॉक़डाऊनचे निर्बंध शिथिल करण्यामध्ये डेन्मार्क यशस्वी झाल्याबदद्ल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. परस्परांच्या अनुभवातून शिकण्यासाठी भारतीय आणि डॅनिश तज्ञ एकमेकांच्या संपर्कात राहण्याबाबत यावेळी सहमती व्यक्त करण्यात आली.

भारत- डेन्मार्क संबंधांना अधिक बळकट करण्याचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला आणि कोविड-19 पश्चात जगात एकमेकांसोबत मिळून काम करण्याबाबत चर्चा केली. 12 मे 2020 रोजी दोन्ही देशाच्या परराष्ट्रमंत्र्यादरम्यान झालेल्या संयुक्त आयोगाच्या बैठकीच्या यशस्वी आयोजनाचे त्यांनी स्वागत केले. आरोग्य संशोधन, स्वच्छ आणि हरित उर्जा आणि हवामान बदलाला तोंड देण्याच्या उपाययोजना अशा विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांना परस्पर सहकार्यासाठी मोठा वाव असल्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. तसेच भारत आणि डेन्मार्क यांच्यात एक भक्कम हरित धोरणात्मक भागीदारी निर्माण करण्यासाठी काम करण्याची वचनबद्धता यावेळी व्यक्त करण्यात आली.

Exit mobile version