नवी दिल्ली : देशात काल कोविड १९ चे ३ हजार ९६७ नवे रुग्ण आढळले तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला. देशातला कोरोनाबाधितांचा आकडा आता ८१ हजार ९७० झाला असून ५१ हजार ४०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. २७ हजार ९१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या आजारामुळे २ हजार ६४९ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ३४ पूर्णांक ६ शतांश टक्के आहे.
राज्यात काल आणखी एक हजार ६०२ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा २७ हजार ५२४ इतका झाला आहे. काल या आजारानं राज्यात ४४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात एक हजार १९ जणांचा मृत्यू झाला. तर काल ५१२ जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं, राज्यात आतापर्यंत सहा हजार एकोणसाठ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
औरंगाबाद शहरात सिडको एन सहा परिसरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेली गल्ली सील केली असून, हा परिसर औषण फवारणी करून निर्जंतुक केला जात आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरात आज नवीन ७४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळलं, त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाविषाणू बाधितांची संख्या ८२३ झाली आहे. दरम्यान औरंगाबाद इथं रविवार १७ तारखेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत.
जालना जिल्ह्यात १८ कोरोनाबाधितांपैकी सात रुग्णांचे सलग दोन कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत. यापैकी कोरोनामुक्त झालेल्या पाच रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे.
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात शेवडी या मूळगावी मुंबईहून परतलेल्यांपैकी तिघांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या सर्वांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत.
सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्यातील भिकवडी गावातील ११ वर्षाच्या मुलाला कोरोनाविषाणूची लागण झाली आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ४४ झाली आहे
रायगड जिल्हय़ात आज ३१ रूग्ण वाढले असून जिल्हयातल्या रुग्णाची संख्या ४२८ झाली आहे. पनवेल महानगर पालिका हद्दीत २०, पनवेल ग्रामीण ७, खालापूर २, महाड १ तर पेणमधे १ रूग्ण आज आढळून आला. पनवेल (ग्रामीण) मधील एकाचा आज मृत्यू झाला आहे.