Site icon साप्ताहिक एकच ध्येय

फलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार – मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची माहिती

भंडीशेगाव येथे फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथांचे उद्घाटन

पंढरपूर : पारंपरिक शेतीबरोबरच फलोत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळायला हवे. फलोत्पादनामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावतो. त्यामुळे फलोत्पादनाच्या योजनांसाठी निधीत वाढ केली जात आहे, असे फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनामंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.

श्री. क्षीरसागर यांच्या हस्ते भंडीशेगाव येथे आज फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथांचे आज उद्घाटन आज झाले. आषाढी एकादशीला राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या वारकऱ्यांपर्यंत फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी या चित्ररथ तयार करण्यात आले आहेत.

मागेल त्याला शेततळे योजनेला आता 95 हजार अनुदान दिले जाईल. यापूर्वी केवळ पन्नास हजार रुपये दिले जात होते. शेतरस्ते जोडण्यासाठी महत्त्वाची योजना आखण्यात आली आहे. एक किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आणखी अठ्ठावीस प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री क्षीरसागर यांनी दिली.

राज्यातील बहुतांश भाग कोरडवाहू आहे. या भागात फलोत्पादन वाढावे यासाठी राज्य शासनाने विविध योजना आखल्या आहेत. फलोत्पादनाखालील क्षेत्र वाढावे यासाठी मागेल त्याला शेततळे ही महत्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेसाठी अधिक निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही श्री. क्षीरसागर म्हणाले.

Exit mobile version