Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्रात या, उद्योग सुरू करा : गुंतवणूकदारांसाठी उद्योग विभागाचा पुढाकार

मुंबई : संकटासोबत संधीही निर्माण होते. कोरोनामुळे राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्याचा देश-विदेशातील गुंतवणूकदारांना फायदा घ्यावा असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

 नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी एमआयडीसी औद्योगिक शेड उभे करून देणार आहे. विविध परवान्यांऐवजी महापरवाना घेऊन उद्योग सुरू करता येईल. याशिवाय एमआयडीसीबाहेरील जमीन अधिग्रहित करून उद्योग सुरू करण्यास चालना दिली जाईल.

विदेशी गुंतवणुकदारांसाठी एमआयडीसीने राज्याच्या विविध भागांत सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. यामध्ये पाणी, वीज रस्ते आदी पायाभूत सुविधा सज्ज ठेवल्या आहेत. गुंतवणूक करार केल्यानंतर थेट उत्पादन सुरू करण्यासाठी एमआयडीसी स्वखर्चाने औद्योगिक शेड उभे करणार आहेत. या ठिकाणी प्ले अँड प्लगद्वारे थेट उद्योग सुरू करता येईल.

विदेशी गुंतवणूकदारांच्या सल्लागारांसोबत उद्योग विभागाचे अधिकारी चर्चा करत आहेत. याशिवाय विविध देशांच्या वाणिज्यदूतांसोबत चर्चा केली जाईल.

राज्यात उद्योग वाढीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने खुले धोरण स्वीकारले आहे. विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना दिला जाईल. उद्योग सुरू झाल्यांतर पुढील एक दोन वर्षांत इतर विभागांचे परवाने घेण्याची मुभा दिली जाईल.

मनुष्यबळाची टंचाई भासू नये यासाठी कामगार ब्युरोची स्थापना करण्यात येणार आहे. याद्वारे उद्योगांना लागणारे कुशल, अकुशल मनुष्यबळ अवघ्या सात दिवसांत पुरविण्याचे नियोजन उद्योग विभागाने केले आहे.

गुंतवणूकदारांनी या सर्व संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन श्री. देसाई यांनी ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज व वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या वतीने आयोजित वेबिनारदरम्यान केले.

Exit mobile version