Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सामाजिक कार्यकर्त्या सविताताई रणदिवे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील निष्ठावान सैनिक, उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई रणदिवे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सविताताई रणदिवे यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणतात की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना प्रत्येक पावलावर, प्रत्येक कार्यात सविताताईंनी समर्थ साथ दिली. दिनू रणदिवे साहेबांच्या बरोबरीनं त्यांचं स्वत:चं सामाजिक कामही खूप मोठं आहे. राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारात वाढलेल्या सविताताईंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्वाचं योगदान दिलं. दुर्बल, वंचित, शोषित, आदिवासी, कामगार वर्गाच्या हक्कांसाठी त्या जीवनभर काम करीत राहिल्या.

समाजातील उपेक्षित घटकांसाठी त्या मोठा आधार होत्या. शिक्षिका म्हणून काम करतांना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मुल्ये आणि सामाजिक जाणीव रुजवण्याचं काम केलं. साधी राहणी, उच्च विचारांची परंपरा जपणाऱ्या सविताताईं या नवीन पिढीतील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आदर्श, प्रेरणास्त्रोत होत्या. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, पुरोगामी चळवळीतील आदर्श व्यक्तिमत्व पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Exit mobile version