ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायावर परिणाम होऊ नये यासाठी मायक्रो कंटेन्मेंट झोनवर भर द्या – जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचना
Ekach Dheya
विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद
स्वगृही परतणाऱ्यांसाठी पासेस व वाहतुक व्यवस्था जलदगतीने करा
पुणे, दि.16: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे जिल्हयातील ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायावर परिणाम होणार नाही, या पध्दतीने प्रतिबंधित क्षेत्र ठरवावे. तसेच सुक्ष्म नियोजन करुन ज्या भागात आवश्यकता आहे, त्याच परिसरात सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, महसूल व अन्य विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आज जिल्हाधिकारी श्री. राम यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी, सुभाष भागडे, संदेश शिर्के, निता शिंदे आदी सहभागी झाले.
पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्वात जास्त कोविड-19 चे रुग्ण हे हवेली तालुक्यात आहेत. येथील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री.राम म्हणाले, शहरानजीक असणाऱ्या चाकण, तळेगाव, हिंजवडी आदी औद्योगिक क्षेत्रांच्या कामावर टाळेबंदीमुळे परिणाम होऊ नये, याचीही काळजी घ्यावी.
कोरोना प्रतिबंधासाठी जुन्नर तालुक्यात सर्व यंत्रणांच्या समन्वयाने उत्तम नियोजन केले आहे. त्या धर्तीवर अन्य तालुक्यांत देखील विविध विभागांच्या मदतीने सुक्ष्म नियोजन करुन त्याप्रमाणे कार्यवाही करावी. बिहार व उत्तरप्रदेश अशा परराज्यांमध्ये परतण्यासाठी इच्छूक सुमारे 1 लाख 21 हजार कामगारांना परवानगी मिळवून देण्यासाठी तेथील प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले असून त्यांच्याकडून परवानगी प्राप्त झाल्यावर पाठविण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगून संबंधित प्रशासनाची परवानगी मिळाल्यावर विद्यार्थी व कामगारांना परतण्यासाठीचे पासेस वेळेत तयार करावेत. तसेच त्यांच्या प्रवासासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने बसेस उपलब्ध करुन द्याव्यात, याबरोबरच निवारागृहातील मजुरांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था चोख पार पाडून याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. राम यांनी दिल्या.
परराज्यातून व जिल्हयातून पुणे जिल्हयात प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या नागरिकांची माहिती अद्ययावत ठेवणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करुन घेणे, गृह अथवा संस्थात्मक विलगीकरण करणे आदी आवश्यक त्या बाबी पूर्ण करुन घेण्यासाठी महसूल व आरोग्य विभागाच्या मदतीने पोलीस विभागाने अद्ययावत प्रणाली विकसीत करुन कार्यवाही करावी.
शेतकऱ्यांना बि-बियाणे, खतांचा तुटवडा भासू नये यासाठी खरीप हंगामपूर्व कामे करुन घ्यावीत. तसेच मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेऊन सर्व कामे वेळेत पुर्ण करा. महत्वाच्या प्रकल्पांसाठीची भूसंपादनाची प्रक्रिया देखील पूर्ण करावी ही सर्व कामे पार पाडतांना सोशल डिस्टंन्सींग, मास्कचा वापर करुन आरोग्याची काळजी घ्या, असेही श्री. राम यांनी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी योग्य त्या सूचना केल्या. तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.