नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगाल आणि बिहारमधून रोजगारासाठी आलेल्या स्थलांतरित कामगारांना घेऊन पहिली श्रमिक विशेष रेल्वे गाडी आज मुंबईहून रवाना झाली. या दोन्ही राज्यांकडून स्थलांतरित कामगारांना माघारी धाडण्यासाठी परवानगी मिळत नव्हती.
मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी संमती दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. आणखी किमान १० गाड्या पाठवाव्या लागतील असं ते म्हणाले.
आतापर्यंत १९१ श्रमिक विशेष गाड्यांमार्फत सुमारे पावणेतीन लाख स्थलांतरित कामगार आपापल्या राज्यात परतले असून त्यांचा प्रवासखर्च राज्यशासनाने केला आहे.