Site icon साप्ताहिक एकच ध्येय

गोरेगावच्या नेस्को विलगीकरण केंद्राची पालकमंत्री अस्लम शेख, आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

मुंबई : मुंबईतील सर्वात मोठे प्रदर्शन केंद्र असणाऱ्या गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभ्या राहत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या २६०० खाटांच्या कोरोना काळजी केंद्र २ ची राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली.

पालकमंत्री श्री.अस्लम शेख म्हणाले की, नेस्को प्रदर्शन केंद्रामध्ये ५ मोठे प्रदर्शन सभागृह आहेत. या सर्व  सभागृहांचं रूपांतर आता विलगीकरण कक्षात करण्यात येत आहे. हे संपूर्ण केंद्र एकूण २६०० खाटांच्या क्षमतेचं असणार आहे. याठिकाणी प्राणवायूची (व्हेंटिलेटर) सुविधा असणाऱ्या सुमारे २००० खाटा असतील.  महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिला जाणार आहेत. इथे ठेवण्यात येणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या नातलगांना त्रास होऊ नये म्हणून विविध मदत कक्ष देखील बनवण्यात येत आहेत. चौकशी कक्ष, निर्जंतुकीकरण कक्ष, वैद्यकीय तपासणी असे विविध कक्ष असतील. याठिकाणी पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत.

३०० खाटा डायलेसिस व अतिदक्षता विभागासाठी राखीव ठेवण्यात येतील. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर या तयारीबाबत पालकमंत्री अस्लम शेख यांनी समाधान व्यक्त केलं.

Exit mobile version