कोविड- 19 विषाणूच्या उपचारामधून निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापनाबाबत बैठक संपन्न
Ekach Dheya
पुणे : कोविड -19 विषाणूच्या उपचारामधून निर्माण होणा-या जैव वैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापना संदर्भात हरित लवाद व राज्याचे मुख्य सचिव यांनी जिल्हास्तरावर उपाययोजना करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस, प्रताप जगताप, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे डॉ. साळवे आदींसह जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन करणा-या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी कोविड 19 विषाणूच्या उपचारामधून निर्माण होणा-या जैव वैद्यकीय कच-याचे व्यवस्थापन, अडचणी तसेच उपाययोजनांवर चर्चा झाली. पुणे महानगरपालिका व पिंपरी -चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात दोन जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन करणारे प्रकल्प उभारणीबाबतही नियोजन करण्यात आले. जैव वैद्यकीय कचऱ्यातून अन्य आजार किंवा संसर्ग बळावण्याची दाट शक्यता असल्याने या कचऱ्याचे व्यवस्थापन होण्याची गरज आहे.
यासाठी अशा स्वरुपाचा कचरा संकलित करून त्याची संबंधित यंत्रणेमार्फत विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. जैव वैद्यकीय कचरा स्वत:हून व्यवस्थित संबंधित संस्थेकडे नित्यनियमाने दिल्यास जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य होईल आणि आपले आरोग्य निरोगी राखण्यास आणखी मदत होईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.