एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तींपैकी ५ हजार ५६९ अनुज्ञप्ती सुरू- आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती
मुंबई : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5,569 अनुज्ञप्ती सुरू आहेत. आज एका दिवसात अंदाजे 32,700 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
राज्यात 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. मद्यसेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणालीबाबत संकेतस्थळावर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दूर करण्यात येत आहेत. तोपर्यंत मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निदर्शनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पद्धतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी न करता मद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.
दि.19 मे, 2020 रोजी राज्य शासनाने नमुना FL-III (परवाना कक्ष) अनुज्ञप्तींकडील शिल्लक मद्यसाठा संपेपर्यंत अथवा लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत जे आधी होईल तोपर्यंत एम.आर.पी. दराने सीलबंद बाटलीत मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे. सदर आदेश ज्या-ज्या जिल्ह्यात ज्या कार्यक्षेत्रात ज्या दिवशी ज्या वेळी मद्यविक्री सुरु आहे तेथे संबंधित प्राधिकृत अधिकारी यांच्या मान्यतेने लागू राहील.
शासनाने दि.03 मे,2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. सदर मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यांतील (3 कोरडे जिल्हे गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर वगळता) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरु आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री बंद आहे.
महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. दि.18 मे, 2020 रोजी राज्यात 82 गुन्हे नोंदविण्यात आले असून 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे. रु.20.97/- लाखकिंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि.24 मार्च, 2020 पासुन दि.18 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5797 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2601 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 582 वाहने जप्त करण्यात आली असून रु.15.56/- कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून हा ई-मेल – commstateexcise@gmail.com आहे.