चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी, एन डी आर एफच्या ४१ तुकड्या तैनात
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं ऊंफून हे चक्रीवादळ, उद्या बंगालचा उपसागर ओलांडून, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकेल. त्याचा प्रभाव दिघा, सुंदरबन, हतीया, या भागांवर जाणवेल. यावेळी, ताशी १५५ ते १८५ किलोमीटर वेगानं वारे वाहतील असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये, पश्चिम मिदनापूर, साऊथ आणि नॉर्थ २४ परगणा, हावडा, हुगळी आणि कोलकाता या जिल्ह्यांमध्ये, तर ओदिशात, जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक, जजपूर आणि बालासोर या जिल्ह्यांमध्ये,मोठं नुकसान होण्याचा इशारा, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक, मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिला आहे.
चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणाऱ्या भागात रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुविधा तात्पुरती बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही त्यांनी केलं. तसंच आसाम आणि सिक्कीमच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी, एन डी आर एफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ४१ तुकड्या, पश्चिम बंगाल आणि ओदिशात तैनात केल्या आहेत अशी माहिती, एन डी आर एफ चे महासंचालक एस एन प्रधान यांनी दिली आहे.