Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

पुणे : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व साखर आयुक्त सौरभ राव यांनी ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. प्रशासनामार्फत या ठिकाणी सुरु असलेल्या विविध उपाययोजनांबाबत माहिती घेऊन येथील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सुचना त्यांनी संबधित विभागांच्या अधिका-यांना केल्या.

यावेळी ढोले – पाटील क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असणा-या पुणे महानगरपालिकेच्या महात्मा जोतिबा फुले प्राथमिक विद्यालयात सुरु असलेल्या स्वॅब तपासणी केंद्राला तसेच संस्थात्मक अलगीकरण केलेल्या नागरिकांच्या विविध कक्षांना डॉ. दीपक म्हैसेकर व सौरभ राव यांनी भेटी देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. तसेच ताडीवाला रोड परिसरातील विविध वसाहतींची पाहणी करुन कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने येथील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने मास्क, सॅनिटायझर व अन्य सुविधा देण्यात येत असल्याची खात्री केली.

तसेच नागरिकांना पुरविण्यात येणा-या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा, देण्यात आलेल्या सुविधा, त्यांची भोजन व्यवस्था, आरोग्य विषयक सेवा सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई इत्यादी बाबींची सविस्तर माहिती घेतली. तसेच येथील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करताना कोणकोणत्या विषयी माहिती संकलित करावी, हे करत असताना कोणत्या बाबींची खबरदारी घ्यावी, याबाबत त्यांनी सुचना केल्या.

यावेळी नगरसेविका लता राजगुरु, महापालिकेचे उपायुक्त विजय दहिभाते, सहाय्यक आयुक्त दयानंद सोनकांबळे, सहाय्यक आयुक्त संदिप कदम, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे, डॉ. संदिप धेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र रसाळ आदि उपस्थित होते.

Exit mobile version