दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायला केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी
Ekach Dheya
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयानं CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, ICSE अर्थात भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र आणि इतर राज्य शिक्षण मंडळाना टाळेबंदी दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायला परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात देशव्यापी टाळेबंदी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी विशेष बसची सोय करायला सांगितलं आहे. पण प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही परीक्षा केंद्राला परवानगी दिली जाणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
परीक्षा केंद्रात शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी मास्क घालावा आणि सुरक्षित अंतराच्या निकषांचं काटेकोर पालन करावं, थर्मल स्क्रीनिंग आणि निर्जंतुकीकरणाच्या सोयीही परीक्षा केंद्रांवर उपलब्ध असतील. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन लवकरात लवकर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावं, असं गृहसचिवांनी सर्व शिक्षण मंडळाना सांगितलं आहे.