नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सध्या ६१ हजार १४९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना सांगितलं की सध्या २ पूर्णांक ९ दशांश टक्के रुग्ण ऑक्सीजनवर असून ४५ शतांश टक्के रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. ४२ हजार २९८ रुग्ण कोविड-१९ मधून बरे झाले आहेत. लॉकडाऊन सुरु झाला त्यावेळी रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ७ पूर्णांक १ दशांश टक्के होतं ते आता जवळजवळ ४०% झालं आहे.
जगभरात iकोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण १ लाख लोकसंख्येमागे ६२ रुग्ण असं असून भारतात ते फक्त ७ पूर्णांक ९ दशांश इतकंच आहे. कोविड १९ सर्वात जास्त फटका बसलेल्या देशात हे प्रमाण प्रति १ लाख ११५ ते ४९६ रुग्ण असं आहे. कोविड १९ चा मृत्यूदर जगात लाखामागे ४ पूर्णांक २ दशांश आहे, तो भारतात केवळ २ दशांश टक्के आहे. जगातल्या ९ देशांमधे दर एक लाख लोकसंख्येत १० जणांचा मृत्यू कोविडने झाला आहे.
सरकारनं वेळेवर केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत असं या अधिकाऱ्याने सांगितलं. ६ देशांत २ लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळले असून सर्वात जास्त प्रादुर्भाव १४ लाख रुग्ण इतका आहे. ६ देशांत १० हजारापेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत. भारतात एकूण रुग्णसंख्या २ लाख ६ हजाराच्या घरात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारं, आणि देशवासियांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारताला या संकटाचा सामना चांगल्या प्रकारे करता आला असून आव्हान अद्याप संपलेलं नाही. लौकर निदान, जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळं परिस्थिती नियंत्रणात असल्याचं ते म्हणाले.