मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ४०० गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.
टीकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४०० गुन्ह्यांची (ज्यापैकी १८ एन.सी आहेत) नोंद १९ मे २०२० पर्यंत झाली आहे.
गुन्ह्यांचे विश्लेषण
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७० गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १५८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टीकटॉक विडिओ शेअर प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २१३ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात यश आले आहे.
वैयक्तिक नोटीस पाठवणार
सध्या लॉकडाऊन सुरु झाल्यापासून लॉकडाऊन व कोरोना महामारीच्या संदर्भात विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. सदर गुन्हे हे मुख्यतः टीकटॉक विडिओ बनविणे, सोशल मीडियावर वेगवेगळी भडकावू पोस्ट टाकणे, कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देणाऱ्या पोस्ट्स टाकणे, कोरोना महामारीबद्दल चुकीची माहिती देणे, कोरोनाग्रस्तांची नावे जाहीर करणे, विविध राजकीय नेत्यांची बदनामी करणारी पोस्ट्स टाकणे किंवा फोटोज टाकणे, त्यांच्यावर हीन दर्जाच्या टीका करणे, सर्व साधारण नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणे इत्यादी गुन्ह्यांचा समावेश आहे.
सदर वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी गृहमंत्र्यांचे मार्गदर्शन व आदेशानुसार सायबर गुन्हे करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या लोकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, त्यांनी अशा प्रकारचे सायबर गुन्हे केल्यास त्यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६०, माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ व अन्य कायद्यांद्वारे सदर व्यक्ती विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. असे गुन्हे रोखण्यासाठी आरोपीस फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ (Criminal Procedure Code 1973) कलम १४९ अन्व्ये व्यक्तिगतरित्या खालील प्रमाणे नोटीस पाठविल्या जातील याची नोंद घ्यावी.